Government Alert : “मेफ्टाल” पेनकिलरचे अतिसेवन जीवघेणे ठरु शकते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोकेदुखी किंवा अंगदुखी सारख्या समस्या जाणवायला लागल्या की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता बरेचदा “मेफ्टाल” हे वेदनाशमक औषध घेतात. अशा सगळ्यांना सरकारने एक सावधानतेचा इशारा दिला आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता हे औषध घेणे आणि या औषधाचे अतिसेवन हे दोन्ही घातक ठरू शकते असे सरकारने म्हटले आहे. तशा सूचनाच सरकारने जारी केल्या आहेत.

हिंदुस्थान सरकारने मेफ्टाल या औषधाबाबत अलर्ट जारी केला आहे. या औषधामुळे शरीरात संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते.  हिंदुस्थान फार्माकोपिया कमिशनने (IPC) वेदनाशामक औषध “मेफ्टाल” संदर्भात डॉक्टर आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेफ्टाल या औषधाच्या अतिसेवनामुळे ड्रेस सिंड्रोम सारख्या गंभीर स्वरुपाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. या एलर्जीचा परिणाम संपूर्ण शरीरावर होण्याची शक्यता आहे.

आयपीसीने (IPC) आरोग्य सेवा तज्ञ, रुग्ण आणि ग्राहकांना सल्ला दिला आहे की जर मेफ्टाल औषधाच्या सेवनाने कोणताही प्रतिकूल परिणाम जाणवला तर तातडीते त्या औषधाचे सेवन बंद करावे. डॉक्टर आपले मत मांडताना म्हटले की, कोणत्याही औषधाचा परिणाम हा वेगवेगळा असून तो रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो. असे असलं तरी, डॉक्टर रुग्णाला मेफ्टाल मर्यादित डोसमध्ये घेण्याचा सल्ला देतात. पण, एखाद्याने स्वत:हून हे औषध जास्त प्रमाणात घेतले तर त्याला त्रास होऊ शकतो.

मेफ्टाल संदर्भात गंभीर बाब म्हणजे, हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही. हिंदुस्थानतल्या सर्व औषध विक्री दुकानांमध्ये हे औषध उपलब्ध आहे. मासिक पाळी मुळे होणाऱ्या वेदना, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारख्या शारिरीक वेदना कमी करण्यासाठी लोकं मोठ्याप्रमाणात डॉक्टरांचा सल्ला न घेता “मेफ्टाल”चे सेवन करत असतात.

“मेफ्टाल” घातक का आहे?

मेफ्टाल या औषधाच्या अतिसेवनामुळे ड्रेस सिंड्रोम नावाची एलर्जी होते.  ही एलर्जी काही वेळा जीवघेणी ठरते. या एलर्जी मुळे ताप येणे, त्वचेवर पुरळ उठणे असा त्रास होतो. काहीवेळा अवयवांवरही या औषधाचा दुष्परिणाम होतो. या औषधामुळे मृत्यू होण्याची भीती असते.