31 डिसेंबरच्या बंदोबस्ताला हजर राहा, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाताळची धूम सर्वत्र सुरू असताना आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या थर्टी फर्स्टकडे. त्या दिवशी काय धम्माल, मजा-मस्ती करायची याची तयारी सुरू आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर येणार असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. थर्टी फर्स्टला शहरात सर्वत्र बंदोबस्त लावायचा असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नववर्षाच्या स्वागताची नागरिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला समुद्रकिनारे, हॉटेल्स, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी उसळणार आहे. लोक कुटुंबकबिल्यासह एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणार आहते. तरुणाईदेखील मोठय़ा संख्येने असणार आहेच. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱयांच्या वैद्यकीय वगळता बाकी सर्व सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्या दिवशी जास्तीत जास्त मनुष्यबळ बंदोबस्ताला उपलब्ध करण्यासाठी सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.