कश्मिरी पंडितांवरून सरकारचं फक्त राजकारण, समस्या जैसे थे! संजय राऊतांकडून मोदी सरकार ‘टार्गेट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू ‘जय शिवराय’, ‘जय बाळासाहेब’ घोषणांनी दणाणले

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी जम्मूत आंदोलन करणाऱ्या कश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राजकारण करत सत्तेवर आलेल्या केंद्रातील सरकारवर निशाणा साधला. यावेळी ‘जय शिवराय’, ‘जय बाळासाहेब’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी गेल्या 256 दिवसांपासून धरणे धरणे आंदोलन सुरू आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी कश्मिरी पंडितांना एक विश्वास दिला. तसेच ते म्हणाले की, ‘केंद्र सरकार देशभरात कश्मिरी हिंदूंच्या नावावर सातत्याने राजकारण करत आहे, मात्र आज ते पुन्हा एकदा टार्गेट किलिंग होऊन दहशतीत असताना सरकार त्यांच्या बदलीच्या मागण्या मान्य करत नाही’. तसेच यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या कर्मचाऱ्यांच्या समस्या आगामी संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी आंदोलकांना संबोधित करताना सांगितले. महाराष्ट्र आणि शिवसेना नेहमीच कश्मिरी पंडितांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही एकत्र राहिल, असेही ते म्हणाले. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कश्मिरी हिंदूंच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, कश्मिरी पंडितांनी संजय राऊत यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधत त्यांच्या मागण्या मांडल्या. यानंतर संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूतील कठुआला रवाना झाले.

यावेळी उपस्थित असलेले शिवसेना प्रदेश प्रमुख मनीष साहनी यांनी संजय राऊत यांना कश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीबाबत कर्मचाऱ्यांची माहिती दिली. जम्मू विमानतळ, बडी ब्राह्मण, सांबा, हिरा नगर येथे शिवसैनिकांनी संजय राऊत यांचे जंगी स्वागत केले.

sanjay-raut-jammu-saheb