
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
उधाणाच्या भरतीमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी मुरुगवाडा, पंधरामाड आणि मिऱ्या बंदर येथे मोठे दगड आणि टेट्रापॉड टाकण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथील नागरिकांना दिले. जिल्हाधिकारी म्हणाले समुद्रांच्या लाटांमुळे व जोरदार पाऊसामुळे जेथे नुकसान झाले आहे तेथे महामार्ग चौपदरीकरणामधील कामात उपलब्ध होणारे मोठे मोठे दगड त्या ठिकाणी टाकण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभिंयता तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या संबधित दिल्या. यामुळे येथील नागरिकांच्या घराना धोका कमी होईल.
जिल्हाधिकारी म्हणाले येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता नगरपालिकेने तयार केलेला येथील रस्ता टिकण्याच्या दृष्टीने येथे संरक्षक भिंत सोबतच बाहेरच्या बाजुला टेट्रापॅड टाकले तर रस्ता सुरक्षित राहील. मुरुगवाडा येथे सरंक्षक भिंत नाही ती बांधण्यात येऊन सोबतच टेट्रापॅड टाकण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.





























































