
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा!
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा!
या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले. राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे यांचे वंशज वीरमाता, वीरपत्नी आणि शिवकन्यांच्या उपस्थितीत भव्य आणि दिमाखदार शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱया या पाळणा सोहळ्याला हजारो शिवभक्त उपस्थित होते. शोभेच्या दारूकामाची आतषबाजी व श्री छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता. यानिमित्ताने सोलापुरात जणू शिवकाळ अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने भव्य पाळणा सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापुरात गेल्या चार वर्षांपासून एस.टी. स्टॅण्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य आणि दिव्य असा शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा साजरा केला जात आहे. सोलापूरच्या कानाकोपऱयातून हजारो शिवभक्त उपस्थित राहतात. विशेषकरून महिला व मुलींनी मराठमोळ्या नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर फेटा आणि कपाळावर चंद्रकोर रेखून पाळणा गीत सादर केले. या सोहळ्यासाठी राजमाता जिजाऊसाहेबांचे वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतलताई मालुसरे, रायबा मालुसरे यांच्यासह दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंके, शिवव्याख्याते दीपक करपे, पालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले उपस्थित होते. या पाळणा सोहळ्याच्या निमित्ताने शेकडो शिवप्रेमींनी भगवे झेंडे घेऊन ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बालमावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत मर्दानी खेळ सादर केले. शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित हा पाळणा सोहळा सोलापूरकरांमध्ये चैतन्य व आनंदाने भरला होता.
पाळणा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रीतम परदेशी, खजिनदार अंबादास शेळके, ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, शिवाजीराव घाडगे, दिलीप कोल्हे, विक्रांत वानकर, अनिकेत पिसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शिवाजी चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी शिवप्रेमींनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या निदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
50 मंडळांनी काढली मिरवणूक
सोमवारी दुपारपासून शहरातील विविध मंडळांनी देखाव्यासह मिरवणूक काढली. शहरात जवळपास 150 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळांतर्गत 50 सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. डीजे व डॉल्बीला फाटा देत लेझीम, झांज यांच्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. संभाजी आरमार आणि मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


























































