ग्रीन क्रूड ऑइलने देश समृद्ध करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

शेती उत्पादनापासून तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन क्रूड ऑइलने विदर्भासह संपूर्ण देश समृद्ध करणार, असा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यात ग्रीन क्रूड ऍण्ड बायोफ्युएल फाऊंडेशनची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.

ग्रीन क्रूड ऍण्ड बायोफ्युएल फाऊंडेशनचे अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या सत्कार केला. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी जैवइंधन, इथेनॉल निर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे, उद्योग किंवा रिफायनरी उभी करणे, रोजगारनिर्मिती, आयात केलेल्या कच्च्या तेलावरील खर्च यावर चर्चा केली. कृषिमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्याने ते फेकून देतो. या कृषिमालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल, असेही गडकरी म्हणाले. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकार्पण केलेल्या ‘इंडिया फॉर इथेनॉल’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत 80 हजारांवर नागरिकांनी भेट दिली.