आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईत प्रथमच होणार ग्रीनॅथॉन 2022 चे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटनमंत्री व उपनगर जिह्याचे पालकमंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा येत्या मंगळवार, 14 जून रोजी वाढदिवस आहे. ‘मुंबई आपली, मुंबई आपल्या झाडांची, मुंबई नव्या नेतृत्वाची, मुंबई नव्या दृष्टीची’ अशी साद घालत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, 12 जून रोजी उत्तर मुंबईत पहिल्या ग्रीनॅथॉन 2022  स्पर्धेचे आयोजन केले आहे. तारामती चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राज प्रकाश सुर्वे यांनी ही माहिती दिली.

राज्याचे पर्यावरणमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक उपक्रम राबवून मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘धावू पर्यावरणासाठी, धावू मुंबईसाठी, धावू जंगलांसाठी, धावू झाडांसाठी’ अशी साद घालत येत्या रविवार, 12 जून रोजी 10 ते 60 वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी ‘ग्रीनॅथॉन 2022’चे आयोजन केले असल्याची माहिती राज प्रकाश सुर्वे यांनी दिली.

स्पर्धेतील विजेत्यांना 5 लाखांची पारितोषिके

उत्तर मुंबई  ग्रीनॅथॉन  स्पर्धा ही त्रिमूर्ती जैन मंदिर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून सकाळी 7  वाजता सुरू होणार असून उत्तर मुंबईच्या नागरिकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली असून स्पर्धेतील प्रत्येक पहिल्या विजेत्यांना सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे स्वतः फुटबॉलप्रेमी असल्याने आणि फुटबॉल या मैदानी खेळाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी स्पर्धेतील 10  ते 18 वयोगटातील स्पर्धकांना फुटबॉल बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सीड बॉल व सीड पेन्सिलचे वितरण

 ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करा अशी साद घालत वृक्ष लागवडीसाठी या स्पर्धेत सहभागी होणाऱया पर्यावरणप्रेमींना सीड बॉल व सीड पेन्सिलचे वितरण करण्यात येणार आहेत. यामुळे उत्तर मुंबई हिरवीगार होऊन येथे हजारो झाडे बहरतील असा विश्वास राज सुर्वे यांनी व्यक्त केला. आपल्या पर्यावरणासाठी योगदान देण्याची आणि आपल्या मुलांना हिरवे भविष्य देण्याची ही सुवर्णसंधी संधी आहे. उत्तर मुंबईतील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्यासाठी या स्पर्धेत मोठय़ा संख्यने पर्यावरणप्रेमी व उत्तर मुंबईच्या नागरिकांनी https://forms.gle/DvUZzvpZiUX5A4i36 यावर पूर्वनोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.