
सामना प्रतिनिधी, पुणे
भांड्याच्या दुकानात जाऊन पाच लाख रुपयांची मागणी करत एका टोळीने राडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ साने चौक चिखली येथे घडली. या टोळीने दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी अस्ताव्यस्त टाकून दिली. तसेच भांडी विक्रीतून जमलेले 7 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित महादेव साठे (वय 18, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, साने चौक, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बंड्या, सुजित, आकाश, संतोष, गणेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचे साने चौकातील साईबाबा मंदिराजवळ भांडी विक्रीचे दुकान आहे. दुकानावर त्यांचे मेहुणे आणि आई असतात.
रविवारी रात्री अमित यांचे मेहुणे आणि आई दुकानावर असताना आरोपी दुकानात आले. त्यांनी पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी अस्ताव्यस्त टाकून दिली. तसेच दिवसभरात भांडी विकून जमा झालेले 7 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले. दुकानाबाहेर जाऊन सर्व आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.


























































