
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा देणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आणि मराठी युवा वाहिनी संघटनेने ऋतुजा रमेश लटके यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला असून तसे पत्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या दोन्ही संघटनांनी अंधेरीच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व संभाजी ब्रिगेडची युती झाली आहे. या युतीचा धर्म जोपास संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेड या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून पूर्ण ताकदीने उमेदवार निवडणून आणण्यास कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोज साखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रद्रोहींना धडा शिकवणार
दिल्लीच्या जुल्मी तख्ताकडून मराठी नेत्यांना कमजोर करून राज्यावर हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी अमराठी शक्तींना बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महाराष्ट्रद्रोहींना धडा शिकविण्यासाठी मराठी युवा वाहिनी संघटना अंधेरीच्या पोटनिवडणुकीत व्यापक प्रचार मोहीम राबवून मराठी जनतेत जनजागृती करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ साबळे यांनी म्हटले आहे.




























































