SSC, HSC Exam – परीक्षेच्या एक ते दीड तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात साडेदहा वाजता तर दुपार सत्रात तीन वाजता सुरू होणार आहे. परीक्षेच्या या निर्धारित वेळेच्या एक ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून तापमान तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे, अशा सूचना शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा लेखी परीक्षेची वेळ अर्धा तासाने वाढविण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळेत बदल करून सुधारित वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाबत परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचनादेखील जारी करण्यात आल्या असून परीक्षा काळात समुपदेशकांना विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरेदेखील शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

  • परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्यात येणार आहे.
  • विशेष परीक्षा ही मूळ परीक्षेचाच भाग असणार, त्यासाठी वेगळे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
  • विशेष परीक्षेतील दोन विषयांमध्ये सार्वजनिक सुट्टी वगळता खंड ठेवला जाणार नाही.
  • परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर, पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • परीक्षा पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे सक्तीचे असेल.
  • विद्यार्थ्यांनी शक्यतो स्वतःचे लेखन साहित्य वापरावे.

बोर्ड परीक्षांच्या तोंडावर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

मागील वर्षभर बोर्डाच्या परीक्षेची ऑनलाइन तयारी करणाऱया दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तोंडावर खासगी कोचिंग क्लासेस मोफत मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्र कोचिंग क्लासेस ओनर्स असोसिएशनने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यूटय़ूबवर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले असून हे वर्ग विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहेत.

कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी नीट करता आलेली नाही. विद्यार्थ्यांना अद्यापही काही अडचणी, शंका असून त्या सोडविण्याचा प्रयत्न कोचिंग क्लासेस असोसिएशन करणार आहे. पेपर पॅटर्न कसा असेल, पासिंग पद्धती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे कोचिंग क्लासेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष वसकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी http://bit.ly/MCOA-MS या लिंकवर संपर्क साधायचा असून दहावीसह बारावी सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाइन वर्ग 27 मार्चपर्यंत सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत उपलब्ध आहेत.