
सामना प्रतिनिधी। नगर
शिर्डी जवळील नाशिक रोड लगत असलेल्या हॉटेल वैभव जवळ देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूसे विक्री करणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याजवळून पिस्तुल व जिंवत काडतूसे असा साठ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आरोपींमध्ये मंगेश सुरेश कोळेकर (२५), अर्जुन महेंद्रकुमार सोनी ( २८), देविदास रंगनाथ लोखंडे ( २८) यांचा समावेश आहे. हे तिघेही गुन्हेगार असून ते तडीपार होते.
काहीजण गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शिर्डी – नाशिक रोडलगत असलेल्या हॉटेल वैभवजवळ पोलिसांनी सापळा रचून या तिघांना रंगेहात पकडले, त्यांच्याजवळून एक देशी बनावटीचे त्यावर मेड इन इंग्लड असे नांव असलेले पिस्तुल, दोन जिवंत काडतुस व रोख रक्कम तसेच दोन मोबाईल असा सुमारे ६० हजार ४०० रुपंयाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. यातील आरोपी देविदास लोखंडे हा तडीपार असलेला गुन्हेगार आहे.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक अरविंद माने, उपनिरिक्षक संदीप कहाळे, पोलिस इरफान शेख, किरण कुर्हे, रामेश्वर वेताळ यांच्या पथकाने केली आहे.


























































