विम्बल्डन : जिगरबाज जोकोविचची अंतिम फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

सुमारे ५ तास १५ मिनिटे आणि तब्बल दोन दिवस रंगलेल्या विम्बल्डन पुरुष एकेरी उपांत्य लढतीत राफेल नडालचे आव्हान ६-४ , ३-६ , ७-६ (९ ), ३-६, १०-८ असे संपुष्ठात आणून सर्बियाच्या नोवाक जोकोविचने बाजी मारली. जोकोविचची ही विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश करण्याची पाचवी वेळ आहे. शुक्रवारी रात्री उशीर झाल्याने ५ सेट्सपर्यंत लांबलेली ही लढत थांबविण्यात आली होती. तेव्हा १२ वा मानांकित जोकोविच २ -१ अशा सेट्सने पुढे होता. आता जेतेपदासाठी जोकोविचला दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनशी झुंझावें लागणार आहे.

जिगरबाज जोकोविचने कालच्या १ सेटच्या आघाडीनंतर आज चौथा सेट ३-६ असा गमावला. पण पाचव्या निर्णायक सेटमध्ये मात्र जोरदार पुनरागमन केले. ९१ मिनिटांच्या पाचव्या सेटमध्ये जोकोविचने आपले सारे कसब पणाला लावत १०-८ असा विजय मिळवत विम्बल्डन फायनलचे तिकीट बुक केले. शुक्रवारची केविन अँडरसन आणि जॉन इसनेर यांच्यातील पहिली उपांत्य लढतही ६ तास ३६ मिनिटे चालली होती. या लढतीत अँडरसनने इसनेरचा ७-६ (८/६), ६-७(५/७ ),६-७ (९ /११ ),६-४ ,२६-२४ असा पराभव केला होता. १९२१ नंतर विम्बल्डन अंतिम फेरी गाठणारा अँडरसन हा पहिला दक्षिण आफ्रिकन टेनिसपटू ठरला आहे. १९२१ ला दक्षिण आफ्रिकेच्या ब्रायन नॉर्टनने विम्बल्डन अंतिम फेरी गाठली होती.