गारपिटीच्या तडाख्याने द्राक्षासह शेतपिकांचा चिखल, शेतकऱयांच्या तोंडचा घास हिरावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोरी, सटाणा, निफाड, मालेगावसह जिह्यात ठिकठिकाणी शनिवारी गारपिटीने मोठा तडाखा दिला. काढणीला आलेल्या द्राक्षांसह शेतीपिके नष्ट झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला, होत्याचे नव्हते झाले, आमच्या स्वप्नांचा आणि कष्टाचाच चिखल झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱयांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाहीत.

शनिवारी पिंपळगाव बसवंत, ओझर, दिंडोरी, मोहाडी, कुर्णोली, जोपूळ, कोराटे, खडक सुकेणे, लखमापूर, जानोरी, चिंचखेड, राजापूर, वरखेडा, सटाणा, घोटी, तरसाळी, औंदाणे, वनोली, कौतीकपाडे, विरगाव, ढोलबारे, चौगाव, देवळा, मकरंदवाडी आदी ठिकाणी वादळी वाऱयासह तुफान पाऊस झाला, गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला, फुलशेती, टरबूज, डाळिंब, मका ही पिके नष्ट झाली. द्राक्षबागा आडव्या झाल्या. वादळ वारे आणि गारांचा तडाखा यामुळे संपूर्ण पाने झडली.

पानगळ, तूटून पडलेले द्राक्षघड आणि मणी यांचा सडा प्रत्येक बागेत दिसतो. एक-दोन दिवसांत काढणार असलेले द्राक्षपीक नष्ट झाले. पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, मशागतीचे, मजुरांचे पैसे कसे द्यायचे, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. पाऊस आणि गारांचा मारा बसलेले द्राक्षघड दोन दिवसांच्या आत कुजून जातील, त्यांच्या काढणीचा खर्चसुद्धा परवडणार नाही, असे शेतकऱयांनी सांगितले.