
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनींच्या हाती हॅण्डहेल्ड टर्मिनलसारखे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्र मिळाल्याने त्यांना आता रिझर्व्हेशनचा कागदी चार्ट बाळगण्याची गरज राहिलेली नाही. हा हॅण्डहेल्ड टर्मिनल प्रवासी आरक्षण यंत्रणेशी (पीआरएस) कनेक्ट असल्याने जर एखादा प्रवासी आला नाही तर रिकाम्या आसनांची यादी ऑनलाईन अपडेट करण्याची सोय यात आहे. त्यामुळे पुढील स्थानकावरील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म चान्स वाढला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने मेल-एक्स्प्रेसमध्ये डय़ुटी बजावणाऱया टीसींच्या हाती 328 हॅण्डहेल्ड टर्मिनल मशीन सोपविल्या आहेत. मध्य रेल्वेने राजधानीसह सुमारे 60 टक्के मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये ही सुविधा निर्माण केल्याने या ट्रेनने प्रवास करणाऱया प्रतीक्षा यादीतील तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता वाढली आहे, तसेच टीसींना आता आरक्षणाचा कागदी चार्ट सोबत ठेवण्याची काहीही गरज राहिलेली नाही. त्यामुळे कागदाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच विनातिकीट प्रवाशांकडून दंड जमा करताना आता या हॅण्डहेल्ड टर्मिनल मशीनवर यूपीआय पेमेंट मोडने ऑनलाईन दंड स्वीकारण्याची सोय निर्माण झाल्याने व्यवहारात पारदर्शकता वाढण्यास मदत मिळणार आहे.




























































