हार्बरवर धावतेय दरवाजा तुटलेली लोकल, रेल्वेचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी रेल्वेकडून एकीकडे एसी लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत, तर दुसरीकडे याच रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतीच हार्बर मार्गावर दरवाजा तुटलेली लोकल धावत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता मध्य रेल्वे मार्गावर आणखी एक दरवाजा तुटलेली लोकल प्रवाशांच्या सेवेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दररोज मोठय़ा प्रमाणात लाखो चाकरमानी प्रवास करतात. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारे मुंबईकर धावतपळतच लोकल पकडतात. मात्र लोकलचा दरवाजा तुटलेला असल्याने घाईगडबडीत ट्रेन पकडणारे प्रवासी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नादुरुस्त लोकलचे दरवाजे रेल्वेने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे. उपनगरीय प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा म्हणून रेल्वेकडून वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू केल्या जात आहेत, तर दुसरीकडे दरवाजा तुटलेल्या लोकल धावत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे साध्या लोकलकडे मध्य रेल्वेचे लक्ष नाही. चक्क तुटलेल्या दारासह लोकल धावत असल्याने प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.