प्रकृती खालावली; हार्दिक पटेल रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पटेल समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱयांमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गेल्या 25 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणारे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेल यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. गुजरातचे भाजप सरकार हार्दिक यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी कालपासून पाणी पिणेही बंद केले आहे.

हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होऊनही भाजपचे गुजरात सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक नाही. गुजरात सरकारने 24 तासांच्या आत हार्दिक पटेल यांच्यासोबत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करावी अशी मागणी पटेल समाजाच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीची होती, पण त्या मागणीकडेही सरकारने काणाडोळा केला. उलट हार्दिक यांचे उपोषण हे काँग्रेस पुरस्कृत आहे असा आराप भाजप सरकारने केला.

भाजपच्या एकाधिकारशाहीविरुद्ध ज्यांनी आवाज उठविण्याचे धाडस केले त्या सर्वांना इशारा देण्यासाठी हार्दिक पटेल यांना ठार करण्याचा गुजरात भाजप सरकार एक कट आखत आहे, असा दावा पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रवक्ते मनोज पानरा यांनी केला आहे.

…तर मोदी, शहांना चहा-पकोडे विकावे लागतील!
शेतकऱयांच्या प्रश्नासाठी उपोषणास बसलेल्या हार्दिक पटेल यांचे काही बरेवाईट झाल्यास देशातील शेतकरी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातमध्ये येण्यास भाग पाडून त्यांना चहा, पकोडे विकण्यास भाग पाडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. हार्दिक यांना आज रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची शेट्टी आणि अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी भेट घेतली.