हरिश्चंद्रगड, कळसूबाई परिसरात पावसाचा हाहाकार

हरिश्चंद्रगड, कळसूबाई अभयारण्य क्षेत्र परिसरात पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने आदिवासीबहुल भागांतील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) सकाळी सहा वाजता संपलेल्या 24 तासांत दोन्ही नद्यांच्या उगमस्थानावर पावसाने हाहाकार घातला आहे. भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील घाटघर येथे 24 तासांत 205 मिलिमीटर म्हणजेच 8 इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पाणलोटक्षेत्रातील पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच धरणातून कमी-जास्त विसर्ग देण्यात येत आहे. भंडारदरा धरण भरल्याने 3252 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरापात्रातून निळवंडे धरणात जात आहे. निळवंडे धरणाची पाणी साठवणक्षमता 8200 दलघफू असून, या धरणाचा सद्यःस्थितीत पाणीसाठा 7857 दलघफू (94.34 टक्के) नियंत्रणात ठेवून प्रवरा नदीपात्रात 6273 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास निळवंडे धरणाच्या स्पिलवेमधून 30 हजार क्युसेकने विसर्ग दिल्याने प्रवरा नदीला मोठा पूर आला होता. मंगळवारी पहाटे त्यात कपात करण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील 16 व अकोले तालुक्यातील आढळा खोऱयातील 15 गावांतून शेतकऱयांसह नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या देवठाण येथील 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 705 दलघफू (66.51 टक्के) व सोनेवाडी (ता. सिन्नर) येथील निमगाव भोजापूर प्रकल्पाचा पाणीसाठा 116 दलघफू (32.13 टक्के) झाला आहे.

ओझर बंधारा ‘ओव्हरफ्लो’

संगमनेर ः भंडारदरा आणि निळवंडे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर संगमनेर तालुक्यातील ओझर बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. बंधाऱयातून डाव्या कालव्याने नेवासाकडे, तर उजव्या कालव्याने देवळाली प्रवराकडे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सध्या बंधाऱयावरून 20 हजार क्युसेकने पाणी वाहत असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे. भंडारदरा निळवंडे धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्यानंतर काल मध्यरात्री दोन्ही धरणांतून मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या