निकिता तोमर हत्या प्रकरण, हरयाणा कोर्टाने तौसिफ आणि रेहानला ठरवले दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील निकिता तोमर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. 21 वर्षीय निकिता तोमरची गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. 1 डिसेंबरला याप्रकरणी खटल्याची सुनावणी सुरू होती. यानंतर तब्बल चार महिन्यांनी फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी आरोपींना दोषी ठरवले. 21 वर्षीय युवतीची 26 ऑक्टोबरला हरयाणामधील फरिदाबाद जिल्ह्यात दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली होती. अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर ही हत्या करण्यात आली होती. तौसिफ आणि रेहान यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा निकिताने विरोध केला तेव्हा तौसिफने बंदूक काढली आणि गोळी चालवली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. हत्येनंतर एसआयटीने तपास हाती घेतला होता. तौसिफ लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप कुटुंबाने केल्याने पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या अँगलनेही तपास केला होता.