राज्यपाल-फडणवीसांमधील चर्चेला चंद्रकांतदादांकडून पुष्टीच – हसन मुश्रीफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत. ते तसे करू शकतात, असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद 12 सदस्यांबाबत राज्यपाल आणि फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेला पुष्टीच दिल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपण दादांचे मनापासून आभार मानतो. कारण मंत्रिमंडळाकडून येणाऱ्या विधानपरिषदेतील 12 सदस्यांबाबत राज्यपाल व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेबाबत चंद्रकांत पाटील यांनी वारणेवर केलेल्या वक्तव्याचा स्पष्ट इन्कार केलेला नाही. दुपारी आपली पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत. ते तसे करू शकतात असे म्हटले आहे. म्हणजेच त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची त्यांनी पुष्टीच केली आहे. तसेच संध्याकाळीही असे विधान आपण स्वतः केलेले नाही. मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री जोतिबाची शपथ घेतो, असे काहीही म्हटलेले नाही. त्यांचा तो स्वभावही नाही. त्यामुळे आपल्या वक्तव्याला चंद्रकांत पाटील यांनी पुष्टी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याची कोपरखळीही मुश्रीफ यांनी मारली.

त्यांना हिमालयात जावे लागणार नाही
चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती. विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही. त्यामुळे राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही. चंद्रकांत पाटील यांनाही हे माहीत आहे, तसेच ज्या कोथरूडमधून आपण मेधा कुलकर्णींना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजपही तशी परवानगी कशी देईल? असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे त्यांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची येथेच गरज असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.