
सामना प्रतिनिधी, मुंबई
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. कर्नाटकातील पोलिसांना गौरी लंकेशचे आरोपी महाराष्ट्रात सापडतात; परंतु महाराष्ट्रात हत्या झालेल्या दाभोलकर आणि पानसरेंचे आरोपी तपास यंत्रणांना अद्याप सापडत नाहीत ही खरोखरच शोकांतिका आहे, अशा कठोर शब्दांत हायकोर्टाने सरकारला फटकारले. एवढेच नव्हे तर, याप्रकरणी सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि राज्याचे गृह सचिव यांना पुढील सुनावणीवेळी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येचा तपास अहवाल सीबीआय आणि सीआयडीतर्फे हायकोर्टात आज सादर करण्यात आला. हा अहवाल पाहून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणाच्या अहवालावर असमाधान व्यक्त करत न्यायालयाने पोलिसांना फटकारले. आता सीआयडी आणि सीबीआयने दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या तपासकार्यात कर्नाटक पोलिसांची मदत घेतली पाहिजे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
































































