
विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी लढा उभारणारे, शिक्षकांच्या प्रश्नांवर लढा उभारणारे शिक्षण क्षेत्रातील खंदे कार्यकर्ते मुंबई मुख्याध्यापक महासंघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.
रेडीज सरांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या ते कांदिवलीतील हिल्डा पॅस्टेलिनो मराठी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनामुळे आजारी होते. त्यांच्यावर कांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण बुधवारपासून अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
अनुदानाच्या प्रश्नावर रेडीज यांनी अनेक आंदोलने छेडली होती. त्यांनी 25 वर्षे अध्ययनाचे काम केले. मराठी कायम विनाअनुदानित शाळांचा कायम हा शब्द काढून त्यांना अनुदानास पात्र ठरवावे यासाठी त्यांनी तब्बल 17 वर्षे लढा दिला. शिक्षकच नव्हे तर शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक यांच्या विविध प्रश्नांसाठी सतत झटणारा एक नेता गमावल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.


























































