लस घेतल्यानंतर दारू पिऊ शकता का? आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तर

संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यांत ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तसेच 45 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुधवारी एम्समध्ये जाऊन कोरोनाची पहिली लस घेतली आहे.

या लसीसंदर्भात लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहेत. हे संभ्रम दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर दारू पिणे योग्य आहे का? यावर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर दारू प्यायल्यास रुग्णाला त्रास झाल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही.

सोशल मीडियावर दावे केले जात आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर याचा वाईट परिणाम होतो. यावर आरोग्य मंत्रालयाने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. कोरोना लसीची चाचणी ही सर्वप्रथम प्राणी आणि मनुष्यांवर केली आहे. जर याचे दुष्परिणाम दिसले असते तर या लसीला मान्यताच देण्यात आली नसती.

कोरोना लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे. लसीकरणानंतर प्रत्येक व्यक्तीला एसएमएसद्वारे एक फोन क्रमांक दिला जातो. या क्रमाकांवर संपर्क साधून नागरिकांनी आपल्या समस्येचे निवारण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या