
राज्यात उन्हाचा पारा भलताच वाढला असून त्याची तलखी जिवघेणी ठरू लागली आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या नागरिकांची संख्या दुप्पट झाली असून एका आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला रक्तक्षयाच्या विकाराने ग्रस्त होती. त्यावर उपचारांसाठी ती प्राथमिक उपचार केंद्रात जात होती. वाटेत उष्माघाताचा त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात सध्या गेल्या अनेक वर्षांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघाताच्या जवळपास दीड हजार रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्याने नोंदवलेल्या आकडेवारीत यंदाचा उष्माघाताच्या बळींचा आकडा 12 दाखवण्यात आला आहे. गंभीर म्हणजे, खारघर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तरीही हा आकडा 12 असा नोंदवण्यात आला आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, परिस्थिती गंभीर असून अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागांत उष्माघातावर उपचार आणि प्रतिबंधक उपायांची सुविधा उपलब्ध करून देण्याची आत्यंतिक गरज आहे. कारण, सोनाली वाघट नावाच्या 21 वर्षांच्या आदिवासी गर्भवती तरुणीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. पालघर तालुक्यात राहणारी ही तरुणी रक्तक्षयाच्या विकाराने ग्रस्त होती. त्याच्या उपचारांसाठी ती जवळपास साडे तीन किमी लांब असलेल्या प्राथमिक केंद्रात गेली होती. तिथे रक्तक्षयावरील उपचार घेतल्यानंतर ती तेवढचं अंतर चालत गेली. घरी पोहोचल्यानंतर ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.


























































