जयभवानीनगरातील नागरिकांनी रात्र जागून काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहराला धुऊन काढले. जोरदार पावसाने नाले दुथडी भरून वाहू लागले. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यातच विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

जयभवानीनगरातील नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढली, तर रोशनगेट भागात नाल्याचे पाणी घरात शिरले. मध्यरात्री पाऊस सुरू असताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी अग्निशमनच्या पथकासमवेत विविध भागांत जाऊन परिस्थितीची पाहणी करीत मदतकार्य केले.

मृग नत्रक्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी मुसळधार पावसाने शहराला धो-धो धुतले. रात्री १० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास सारखा पाऊस कोसळत होता. त्यामुळे नाले दुथडी भरून वाहू लागले. रस्त्यावर जागोजागी पाणीच पाणी झाले. त्यातच अनेक भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने अंधार पसरला. नागरिकांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले होते. जयभवानीनगरातील नाला भरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घरात कधी पाणी शिरेल, याचा नेम नसल्याने जीव मुठीत धरून नागरिकांनी घरातच रात्र जागून काढली. परंतु या भागात कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पावसाचा जोर ओसरताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी अग्निशमनच्या पथकाला सोबत घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

रोशनगेट, जयभवानीनगर, बजरंग चौक, नूर कॉलनी, घाटी, निराला बाजार, समर्थनगर, समतानगर, सिडको-हडको भागात पथकाला घेऊन गेले. रोशनगेट भागातील नाल्याला पूर आल्याने या पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. महापौरांनी गल्ल्यांमध्ये जाऊन मदतकार्य केले. त्यांनतर जयभवानीनगरात गेले. तेथे नागरिकांचा जागता पहारा सुरू होता. निराला बाजार, समतानगरातील दुकांनामध्ये पाणी शिरल्यामुळे हे पाणी काढण्यासाठी मदत करण्यात आली. बळीराम पाटील चौकात पाणी तुंबल्याचे दिसताच जवानांच्या मदतीने पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली. पहाटे तीन वाजेपर्यंत शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.