
पाऊस पाठ सोडणार नाही; गरज असेल तरच घराबाहेर पडा!
सामना ऑनलाईन, मुंबई
गेले दोन दिवस पाऊस मुंबईकरांची पाठ सोडायलाच तयार नाही. आज रविवारीही मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सूर्यदर्शनही झाले नाही. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. परिणामी मुंबईकरांचा रविवार अक्षरशः पाण्यात गेला. सलग दुसर्या दिवशीही रिपरिप कोसळल्याने मुंबईतील सखल भागांत पाणी साचून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. बेस्टचे मार्ग वळवावे लागले. कुर्ला ते सायनदरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. पुढचे पाच दिवस मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी वार्यासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१२ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस
मुंबईत १२ तासांत तब्बल १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईतील १६ हवामान केंद्रांवर तर उपनगरातील १४ केंद्रांवर रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. चेंबूरमध्ये सर्वाधिक १८४.२ मि.मी. इतक्या तर त्यापाठोपाठ गोरेगावमध्ये १६२.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
या रेकॉर्डब्रेक पावसामुळे कांदिवली लिंक रोड, मिलन सबवे, मालवणी, सिद्धार्थनगर -गोरेगाव, असल्फा, अंधेरी, कुर्ला बैलबाजार, एलबीएस मार्ग, शीव आणि किंग्ज सर्कल, मुख्याध्यापक भवन, हेमंत मांजरेकर मार्ग, ऍण्टॉप हिल, हिंदमाता, वडाळा भागांत गुडघाभर पाणी साचले. परंतु काही वेळातच पाण्याचा निचराही झाला.
लोकल गारठली
पावसाने उपनगरीय लोकल सेवेलाही फटका बसला. मध्य,पश्चिम व हार्बरच्या लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेचा विद्याविहार ते भायखळादरम्यानचा मेगाब्लॉक रद्द करण्यात येऊनही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या रविवारी पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या.
कुर्ल्यात इमारतीचा भाग कोसळला
शहरात ४, पूर्व उपनगरात ५ तर पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी घराचा/भिंतीचा भाग पडण्याच्या तक्रारी आल्या. या घटनांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. कुर्ल्यात हलावपूल येथील भूषण भवन इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला.



























































