
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])
युद्धनीती, सामाजिकदृष्टय़ा, राज्यकारभार किंवा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानींसाठी सार्वकालिक जीवनाचा आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ योद्धा आणि राजनेता म्हणूनच नाही तर एक राज्यकर्ता म्हणूनही अनुकरणीय आहे. ते आपल्या संपूर्ण राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम, हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे ‘शिवाजी महाराज राज्यकारभार, आधुनिक भारतासाठी धडे’ (Shivaji Maharaj State Craft, Lessons For Modern India) हा परिसंवाद 24-25 डिसेंबर 2022 ला आयोजित करण्यात आला होता. परिसंवादांमध्ये 25 वेगवेगळ्या विषयांतील तज्ञांनी शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन आणि करप्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, स्त्रीयांचा आदर आणि त्यांचे कल्याण, आयुध व्यवस्थापन आणि नौदल या वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
2 सप्टेंबरच्या सोहळ्यादरम्यान भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात डौलाने फडकणार आहे. आरमाराचे महत्त्व जाणणारा चोल राजा रामराज याच्यानंतर 600 वर्षांनी शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढय़ शत्रूच्या विरोधात तेवढय़ाच सामर्थ्याने उभे राहावे लागणार होते.
महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे, धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळत होते. या वीरांनी मराठय़ांच्या आरमाराचा वचक शत्रूवर बसवला होता. आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्या जवळ समर्थ आरमार त्याचा समुद्र!’ या उक्तीला अनुसरून शिवाजी महाराजांनी सागरावरून होणाऱ्या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
समाजाच्या संघटित शक्तीचा नेहमीच विजय होत असल्याने शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये संघटनेची भावना निर्माण केली. त्यांनी समाजातील लोकांमध्ये ध्येयाप्रति निष्ठा निर्माण केली. जेव्हा आपल्यात अशी निष्ठा असते तेव्हा आपण आपले दुर्गुण कमी करण्याकडे लक्ष देतो. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श हा सार्वकालिक आणि त्रिकालबाधित आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हरवलेल्या समाजाचा राष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आपल्या समोर आहे, लढण्याचे धाडस सदैव मिळणार आहे. आज हाच खूप मोठा संदेश आहे.
शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेल्या अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या समकालीन राज्यवस्थेचा अभ्यास करून, त्यांच्या उणिवा शोधून स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज स्वतःच स्वराज्याचे मुख्य प्रशासक होते. त्यांची शासन व्यवस्था हिंदुस्थानी नीतिशास्त्रीावर आधारलेली होती.
हिंदुस्थानचा इतिहास पराक्रमाचा, पण हौतात्म्याचा आहे. तथापि, छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशात पुन्हा एकदा विजयाची परंपरा सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या कार्याचे, नीतिमूल्यांचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी केलेले आहे. शत्रुपक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकांवर शिवाजी महाराज औषधोपचार करून सुखरूप माघारी पाठवत असत. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासन प्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते. ब्रिटिश चरित्रकार डेनिस किंकडे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूंचेच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानींचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. शिवाजीराजे उपेक्षित, गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. त्यांनी जातिभेद तसेच स्त्रीाr-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि संधी देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवाजी महाराजांच्या राज्यात व परराज्यांतील मोहिमांमध्ये स्त्रीयांना नेहमीच आदराने, अत्यंत सन्मानाने वागवले जाई. स्त्रीयांना कैद करायला बंदी होती.
राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेत. मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रीयांशी वागायचे.’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, स्त्रीया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा. ही उच्च कोटीची नैतिकता आहे. राजांच्या ठायी अशी नैतिकता होती.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला. 1642 ते 1674 पर्यंतच्या महत्त्वाच्या घटनाप्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊसाहेबांचा सल्ला घेतला. यातून स्पष्ट होते की, स्वराज्यातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग होता. स्त्रीाrसुद्धा बुद्धिमान आहे, हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे यावर शिवरायांचा दृढविश्वास होता. जिजाऊसाहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते की, शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच हे शक्य झाले. शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज आहे. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील.


























































