
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथील जगप्रसिद्ध लेणी हा जिल्हाचा वारसा आहे. परंतू हा वारसा लोप पावण्याच्या स्थितीला आहे. वेळीच दखल घेतली नाही तर यापुढे इथे पण लेणी होती बरं का असं सांगण्याची वेळ लातूरकरांवर येईल असे वाटते.
लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून 45 किमी अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण 12 लेण्यांचा समूह आहे. पहिली लेणी एक बौध्द लेणी आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध यांची बसलेल्या स्थितीत मूर्ती आहे. दुस-या लेणींमध्ये शिवलिंग आहे.
वेरुळ-अजिंठा लेणीच्या अगोदर येथील लेणी कोरण्यात आलेल्या आहेत. मात्र येथील दगड ठिसूळ असल्याने त्या परिपूर्ण करण्यात आलेल्या नाहीत असे सांगितले जाते. बदामी येथील लेणींप्रमाणेच खरोसा येथील लेणी आहेत. या लेण्यांचा कालखंड काही जणांनी सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे.
काही जणांच्या मतानुसार खरोसा येथील लेणी इ. स. 500 ते 700 दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. तर काही जणांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे आठव्या-नवव्या शतकात खोदण्यात आले असावे.
आज या लेण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणाचा वापर बेवडे दारु पिण्यासाठी करत आहेत. दारुच्या बाटल्या सर्वत्र आढळून येतात. एकांत म्हणून फिरण्यासाठी जोडपी (मुले-मुली) आलेली दिसतात.



























































