आता अंगणवाड्या होणार हायटेक! कामकाज ऑनलाइन होणार, सर्व अंगणवाडींना स्मार्ट फोन मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सर्वच विभागांचे काम ऑनलाइन होत असताना त्यातून आता अंगणवाड्याही सुटलेल्या नाहीत. आता अंगणवाड्यांही हायटेक होत असून त्यांचे कामकाजही ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी त्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसिकरण याची माहिती तात्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार असल्याची माहिती जिप महिला व बाल विकास समिती सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रणयकुमार चटलवार यांनी दिली.

सर्वच क्षेत्रात ऑनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून ऑनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर ऑनलाईन कामकाज आले आहे. त्यात आता अंगणवाडी देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला आता स्मार्टफोन हातात घेवून कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात लवकरच असे स्मार्ट फोन वाटप केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास समिती सभेत देण्यात आली.

पूर्वी पुरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे यासह इतर बाबींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते. अहवाल देण्याची कसरत, अंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण, पुरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. त्यासाठी संबधीत ठिकाणी जावे लागते. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. आधीच कमी मानधन त्यात असा अवांतर खर्च त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक फरफट देखील होत असते. मात्र यातून त्यांची सुटका करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आता स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडीला एक स्मार्ट फोन पुरविण्यात येणार आहे. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. रजिस्टरऐवजी आता या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन मध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जाणार आहेत. परिणामी रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे. अशी माहिती आजच्या सभेत देण्यात आली.

अंगणवाडी सेविकेला प्रशिक्षण देणार!
अंगणवाडीचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी त्यांना स्मार्ट फोन दिला जाणार असून त्याद्वारेच आता सर्व माहिती गोळा केली जाणार आहे. मात्र त्यातही जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन कसा हाताळावा, त्यात माहिती कशी भरावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचीही माहिती सभेत देण्यात आली.

सर्दी तापाची औषधे अंगणवाड्यांना द्या
दर तीन महिन्यांनी अंगणवाडी मधील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यावेळी एखादे मुल आजारी असल्यास त्याला औषधे दिली जातात. पण अन्य वेळी या मुलाना आजारी असल्यास अंगणवाडी मध्ये औषध मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी मध्ये सर्दी ताप व खोकला यावरचे औषध उपलब्ध करून देण्यात यावे अशी सुचना सभाध्यक्ष सायली सावंत यांनी सभेत केली.

प्रशिक्षणासाठीची ई निविदा प्रक्रिया रद्द करा
महिला व बाल विकास विभागामार्फत विविध प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. मात्र काही प्रशिक्षणनासाठी ई निविदा प्रक्रिया राबविण्यात येते त्यांना जिल्ह्यात प्रतीसाद मिळत नाही. परिणामी प्रशिक्षणावर खर्च होत नाही. त्यामुळे प्रशिक्षाणांसाठी असणारी ई निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी असा ठराव सभेत घेण्यात आला.