
पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा मोठय़ा चलाखीने वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा प्रकार पेपर सुरू होण्यापुर्वीच उघडकीस आल्यानंतर उमेदवाराने पोबारा केला.
पिंपरी – चिंचवड आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाईपदाच्या 720 जागांच्या भरतीसाठी 80 सेंटरवर लेखी परीक्षा परीक्षा झाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयातील 720 जागांसाठी ऐकून 1 लाख 89 हजार 732 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.
हिंजवडी येथील ब्ल्यू रिज शाळेमध्ये एका उमेदवाराच्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाइस सापडले. मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्डचा वापर करून कॉपी करण्याचा हा प्रयत्न होता. हा प्रकार उघड होताच संबंधित उमेदवार पळून गेला. त्याला कॉपी करण्यासाठी कोण मदत करणार होते, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का? याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.




























































