अच्युत गोडबोलेंना हायकोर्टाचा दिलासा; फ्लॅटचा ताबा देण्यात दिरंगाई करणाऱ्या बिल्डरला तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेखक अच्युत गोडबोले यांना 20 वर्षांपूर्वी बुकिंग केलेल्या फ्लॅटचा ताबा न देणाऱया दर्शन डेव्हलपर्सच्या प्रवीण सत्रा या बिल्डरला उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. नऊ वर्षांपूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या संमतीच्या अटींनुसार नऊ महिन्यांच्या आत दोन फ्लॅट्सचा ताबा दिला नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी बिल्डरला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच गोडबोले यांना 4 कोटींची भरपाई द्या, असे आदेश न्यायालयाने बिल्डरला दिले आहेत.

अच्युत गोडबोले व त्यांच्या पत्नीने 2004मध्ये विलेपार्ले येथील इमारत बांधकाम प्रकल्पात दोन फ्लॅट्स बुक केले होते. तथापि, सन 2014 उजाडले तरी बिल्डरने दोन्ही फ्लॅट्सचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे गोडबोले दांपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी बिल्डरने न्यायालयापुढे हमीपत्र सादर केले आणि पुढील नऊ महिन्यांत फ्लॅट्सचा ताबा देणार असल्याची हमी दिली होती. त्या हमीपत्राला दहा वर्षे उलटल्यानंतरही बिल्डरने फ्लॅट्सचा ताबा दिला नाही. त्यामुळे अवमान कारवाईची मागणी करीत गोडबोले दांपत्याने पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या विनंतीची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बिल्डर प्रवीण सत्राला तीन महिन्यांच्या दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच सहा आठवडय़ांत गोडबोले दांपत्याला 4 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश बिल्डरला दिले. बिल्डरने माफी मागितली आणि एक कोटी रुपये जमा केले आहेत म्हणून त्याला शिक्षेमध्ये दया दाखवता येणार नाही, असेही न्यायालयाने यावेळी बजावले.