भीमा-कोरेगाव प्रकरण; वरवरा राव यांना हैदराबादला जाण्यास मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी, तेलगू कवी वरवरा राव यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबईतून हैदराबादला जाण्याकरिता सोमवारी उच्च न्यायालयाने आठवडाभराची परवानगी दिली. राव यांनी दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दहा दिवसांची परवानगी मागितली होती. तथापि, न्यायालयाने एका डोळय़ासाठी परवानगी देत दुसऱ्या डोळय़ाच्या शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश राव यांना दिले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राव यांना 2018 मध्ये अटक केली होती. उच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता. मार्च 2021 पर्यंत ते न्यायालयीन कोठडीत होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला. सध्या ते याच जामिनावर बाहेर असून दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांनी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. एनआयएने राव यांना दहा दिवसांची सूट देण्यावर आक्षेप घेतला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दहा दिवसांची गरज काय, असा मुद्दा एनआयएतर्फे ऍड. संदेश पाटील यांनी मांडला.