
गुहागर : लक्ष्मीकांत घोणसेपाटील
रत्नागिरी मधील गुहागर तालुक्यातील किनारपट्टीला आज पुन्हा अजस्त्र लाटांचा चांगलाच तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून उधाणाच्या भरतीमुळे रत्नागिरी व गुहागरमधल्या किना-यांची धुप होत आहे. समुद्राच्या उधाणामुळे कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त धुप झाली असून…समुद्राचे पाणी मानवी वस्त्यांकडे शिरले आहे.पडलेली माडाची झालं, वाहून गेलेले किनारे, बंधार्यांवरून होणारा समुद्रचा मारा त्यामुळे त्यांतून वाहून गेलेले बंधारे असे चित्र आता कोकण किनारपट्ट्यांवर पाहायला मिळत आहे.
रत्नागिरीमध्ये मांडवी, मिर्या तर गुहागर मधील वेळणेश्वर अशा महत्वाच्या ठिकाणी समुद्र आपलं रौद्र रूप दाखवतोय, यामुळे किनारे आता मानवी वस्तीकडे सरकू लागले आहेत. तसेच समुद्राच्या भरतीवेळी अजस्त्र लाटांचे तांडव किनारपट्टीवर पहावयास मिळाले. सततच्या लाटांच्या धडाक्याने किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिर्या बंधार्याचे काल पडलेले भगदाड आणखी वाढले असून नारळाची झाडं देखील जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.





























































