देशात कोरोना रुग्णसंख्या घटली, पण मृत्युदर कमी होईना; केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. देशात दिवसभरात आज 5 हजार 874 रुग्ण सापडले तर 25 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, केरळमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. 25 पैकी 9 मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी 10 हजारांपर्यंत गेलेली रुग्णसंख्या आज 5 हजार 874 वर पोहोचली. दरम्यान, रुग्णांबरोबर सक्रिय रुग्णांची 67 हजारांवर पोहोचलेली संख्या ही गेल्या आठवडाभरात 18 हजारांनी कमी होऊन आज ती 49 हजार 15 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुंबई, राज्यात एकही मृत्यू नाही

राज्यात आणि मुंबईतही रुग्णसंख्या कमी झाली असून मुंबई आणि राज्यात आज एकही मृत्यू झाला नाही. राज्यात आज 425 रुग्ण सापडले तर 499 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज 135 रुग्ण सापडले तर 141 जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 928 वर पोहोचली आहे.