
सामना प्रतिनिधी । लातूर
हिंदू खाटीक समाजाच्या न्याय मागण्या शासनाने तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी एका निवेदनाद्वारे संतुजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात पारंपारिक लहान प्राण्यांच्या मांस विक्रीवर उपजिविका भागविणारी खाटीक जात आहे. या जातीच्या लोकांना महाराष्ट्राच्या विविध भागात विविध नावाने ओळखतात जे आजही पारंपारिक लहान प्राण्याच्या मांस विक्री व्यवसायावर उपजीविका भागवतात ही बाब राज्य सरकारने स्वीकारून त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारला शिफारस करावी. संत गंगानाथ महाराज पुणे, संत रामजी बाबा चांदखेड पुणे, श्री क्षेत्र निमगाव दावडी खेड, संत उपासराव महाराज नागपूर, नाथसाहेब जोगाई पसरणी वाई सातारा या तीर्थ स्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन विकसित करण्यात यावे, सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, हिंदुखाटिक समाजाचे भूषण डॉ संतुजी रामजी लाड यांचा जन्म दिवस ४ मार्च व ८ ऑक्टोबर स्मृतीदिन शासनस्तरांवर साजरी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी अ.भा. संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रदीपसिंह गंगणे, अॅड.अमितकुमार कोथमिरे उपस्थित होते.































































