
हिंदुस्थानी संघाचा युवा फलंदाज श्रेयश अय्यर याच्यावर गुरूवारी खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, तसेच तो लवकरच मैदानात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. 26 वर्षीय श्रेयशला पुणे येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेयरस्टोने फटकावलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली होती. दुखापतीचा त्रास मोठ्या प्रमाणावर झाल्याने, इंग्लंड विरूद्धच्या उर्वरीत सामन्यांना त्याला मुकावे लागले होते. तसेच आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
श्रेयशने ट्वीट करत माहिती दिली की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, मी आता पूर्ण वचनबद्धतेने लवकरच पुनरागमन करेन. तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी आभारी आहे.
आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर शस्त्रीक्रियेमुळे चार महिने खेळू शकत नाही. श्रेयशने लंकाशायर संघाबरोबर करार केला आहे, तसेच 23 जुलै पासून सुरू होणाऱ्या इंग्लिश काउंटी एकदिवसीय स्पर्धेसाठी खेळण्याची शक्यता नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या कर्णधारपदी ऋषभ पंतची निवड केली आहे.



























































