हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिबला अटक; दहशतवाद्यांची 47 युनिट उद्ध्वस्त,  जम्मू-कश्मीर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसेन याला पोलिसांनी रविवारी बंगळुरूमधून अटक केली. तालिब हा राजौरी-पूंछ परिसरात दहशत माजवण्याचा कट रचत होता. त्याच्या अटकेने हिजबुल मुजाहिद्दीनला मोठा झटका बसला आहे. या कारवाईसह मागील पाच महिन्यांत दहशतवाद्यांची 47 युनिट उद्ध्वस्त केली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

17 राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेत तालिबच्या मुसक्या आवळल्या. हिजबुल मुजाहिद्दीनने किश्तवाड परिसरात नव्याने भरती करीत आपली ताकद वाढवण्याचे कारस्थान रचले होते. यासाठी तालिब हा किश्तवाडमध्ये दीर्घकाळापासून सक्रिय होता. अलीकडेच त्याने आपले बस्तान बंगळुरूमध्ये हलवले होते. तेथून तो दहशतवादी कारवाया घडवून आणायचा. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथके बंगळुरूमध्ये पोहोचली आणि तेथून तालिबला ताब्यात घेतले. सध्या त्याने राजौरी-पूंछ परिसरात दहशत माजवण्याचा कट आखला होता. तो 2016 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता. दरम्यान, कश्मीर खोऱयात ‘टार्गेट किलिंग’ सुरू ठेवणाऱया सूत्रधारांची ओळख पटल्याचाही दावा जम्मू-कश्मीर पोलिसांनी केला आहे.

कोण आहे तालिब हुसेन?

तालिब हुसेन हा सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेला दहशतवादी आहे. तो स्थानिक गुर्जर जमातीचा असून 2016 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

पाच मुलांचा बाप असलेला तालिब हिजबुलमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा किश्तवाड जिह्यातील मारवाह आणि दाछनच्या वरच्या भागांत शस्त्रांसह फिरताना दिसायचा.

2016 मध्ये तालिब गूढरीत्या गायब झाला. काही महिन्यांनंतर तो दहशतवादी गटात सामील झाल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून सुरक्षा दले त्याच्या मागावर होती.