
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
उबेद होडेकर या तरुणावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. उबेदवर हल्ला करून फरारी असणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी आंबा घाटात पाच जणांना अटक केली त्यानंतर सहांना फरार संशयित सहावा आरोपी अभिजित दुड्ये यालाही अटक करण्यात आली.
दि.12 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास उद्यमनगर ‘एमआयडीसी’ मध्ये उबेद होडेकर यांच्यावर पिस्तूल रोखत धारधार तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी बावा नाचणकर, मुन्ना देसाई यांना अटक केली होती, तर उबेद होडेकर यांच्या तक्रारीनुसार सहाजण फरारी झाले होते. संशयित अल्ताफ संगमेश्वरी, विजय माने, अन्या वालम, हर्षल शिंदे, सिकंदर ऊर्फ काल्या खान हे आंबा घाटातून जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी जाऊन पाचजणांना ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी पोलिसांचे पथक संशयितांना घेऊन रत्नागिरीत दाखल झाले. तर सायंकाळी सहावा संशयित अभिजित दुडये याला अटक करण्यात आली.
उबेद होडेकर यांचा भाऊ हिफजुल रहमान होडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. उबेद होडेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत





























































