पवई आयआयटीसाठी दान केले राहते घर; प्राध्यापकांचा समाजासमोर आदर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या संस्थेत आपण हयात घालवली, सेवा केली तिचे ऋण फेडणे ही आपली जबाबदारी असते किंबहुना ते आपले कर्तव्यच असते. पवई येथील आयआयटी मुंबईतील प्राध्यापक सुबीर कार यांनी ते अचूक बजावले. मृत्यूनंतर आपले पवईतील घर आयआयटी मुंबईला देण्यात यावे, असे मृत्युपत्रच त्यांनी लिहून ठेवले होते. त्यांच्या पत्नी नीना कार यांनी आपल्या पतीच्या इच्छेनुसार राहता फ्लॅट आयआयटी मुंबईकडे सुपूर्द केला. आयआयटी मुंबईला अशा प्रकारे देणगी मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

सुबीर कार विसकोस्नि-मॅडिसन विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर 1962मध्ये आयआयटी मुंबईत प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. आयआयटी मुंबईच्या बायोमेडिकल इंजिनीयरिंग कार्यक्रमात कार यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. फ्लुईड मेकॅनिक्सच्या संशोधनात त्यांची ख्याती होती. तीन दशके त्यांनी संस्थेत सेवा बजावली. 1992मध्ये ते निवृत्त झाले. उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना ‘प्रोफेसर एमेरिटस’ सन्मान देऊन गौरवण्यात आले होते.

1990मध्ये सुबीर कार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांनी आपले मृत्युपत्र बनवले होते आणि आपल्या मालकीचा फ्लॅट संस्थेला देण्यात यावा, असे त्यांनी त्यात नमूद केले होते. पत्नी नीना यांनीही त्यांच्या निर्णयाचा आदर केला होता. ‘अशा प्रकारे आपण संस्थेला मदत करू शकतो हे 25 वर्षांपूर्वी प्राध्यापक कार यांनी निश्चित केले होते. मृत्यूनंतर आपली मालमत्ता दान करण्याची संस्कृती पाश्चात्यांमध्ये अधिक आहे. हिंदुस्थानात तसे क्वचितच घडते. प्राध्यापक कार यांनी ते करून दाखवले आणि समाजासमोर आदर्श घालून दिला.