कोकणात फणसामुळे महिलांच्या हाताला काम, सुरू केला गृह उद्योग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील हवामान फणसासाठी पोषक असते. दापोलीत फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. ग्राहकांची मागणी पूर्ण करूनही फणस शिल्लक राहतात. त्यामुळे येथे गरे खाण्याबरोबरच फणसाच्या प्रक्रिया केलेल्या विविध उत्पादनालाही मोठी मागणी असते.

कोकणात काही वेळा फणस झाडावरच पिकून खाली गळून पडतात. ही बाब दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक या गावातील गायत्री मनोज केळकर यांच्या लक्षात आली. त्यांनी या वाया जाणाऱ्या फणसाचे गरे तळून उत्पादन घेणे सुरू केले. येथे घरामागील परसात, बागेत कापा, बरका फणसाची झाडे हमखास लावलेली आढळतात. गावात बहुतेकांच्या परसात फणसाची झाडे असल्याने फणसाच्या विक्रीवर मर्यादा येते. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या फणसाच्या उत्पादनाला येथे चांगली मागणी आहे.

फणस प्रक्रियेत फणसाचे गरे तळणीचा गृह उदयोग अर्थार्जन मिळवून देणारा आहे. असा हा व्यवसाय हंगामात होत असला, तरी या उद्योगाची आर्थिक उलाढाल चांगलीच होते. दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक या गावात राहणा-या आणि नाशिक येथे माहेर असलेल्या गायत्री मनोज केळकर या विविध प्रकारचा गृहउदयोग करतात. त्यामध्ये गरे तळणीच्या व्यवसायाचाही समावेश आहे.

त्यांच्या या गृहउदयोगामुळे आंबवली बुद्रुक आणि केळशी परिसरातील अकुशल महिला कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे अनेकांची कुटुंबे आर्थिकदृष्टया स्थिरस्थावर झाली आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक नावाची अधिक उत्पन्न देणारी कापा फणसाची जात विकसित केली आहे. ही जात कोकणात लागवडीसाठी उपयुक्त आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही फणस अतिशय उत्तम आहे. फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, राइबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि मँगनीज हे ठासून भरलेलं फळ आरोग्याकरिता फायदेशीर असून अँटिऑक्सिडेंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फणस मदत करते. मधुमेही किंवा वजन कमी करणाऱ्यांकरिता फणस एक चांगला पर्याय आहे, असा दावा कोकण विद्यापीठाने केला आहे.