
राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱयांचे प्रमाण सध्या 15 टक्के आहे. महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या पोलीस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे 28 हजार म्हणजेच 15टक्क्यांच्या आसपास महिला आहेत. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्या उत्कृष्ट काम बजावत आहेत. महिला पोलिसांचे प्रमाण वाढवून 30 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


























































