दोन केळ्यांचे 442 रुपये बिल देणे हॉटेलला पडले महागात, हॉटेलला 25 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन | नवी दिल्ली

अभिनेता राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी 442 रुपये आकारल्या प्रकरणी जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला तब्बल 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलचा ट्विटरवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई केली आहे. जीएसटीच्या कलम 11 नुसार कर नसलेल्या वस्तूंवर बेकायदेशीररित्या करवसूली केल्याप्रकरणी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता राहुल बोस हा सध्या चंदिगढमध्ये एका चित्रपटाचे शूटींग करीत आहे. तेथील पंचतारांकित जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये तो राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याने हॉटेलच्या स्टाफकडून दोन केळी मागवली होती. त्या दोन केळ्यांवर चक्क जीएसटी आकारत त्याला तब्बल 442 रुपयांचे बिल पाठविण्यात आले होते. ते बिल बघून तो हबकला. त्यानंतर त्याने याचा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. त्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी हॉटेलवर टीकेची झोड उठवली होती.

याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मनदीप सिंह ब्रार यांनी जेडब्ल्यू मॅरिएटला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘ताज्या फळांवर जीएसटी आकारणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्पादन व कर विभागाचे सहाय्यक आयुक्कत राजीव चौधरी हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत’, असे मनदीप सिंह ब्रार यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला सांगितले आहे.