सरकारी योजनेतील घरं मिळवून देण्याच्या बहाण्याने कोट्यावधींचा चुना, आरोपीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडा, सिडको, झोपू योजनेतील घरं मिळवून देतो अशी बतावणी करत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला शीव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शरद पेडणेकर (वय – 50) असे आरोपीचे नाव असून त्याने 25 हून अधिक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मंत्रालयात माझ्या चांगल्या ओळखी आहेत. मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून मी काम करून घेतो असे सांगत शरद नागरिकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या बतावण्या करून विश्वास संपादन करत होता. दिनकर (नाव बदलेले) यांना घर घ्यायचे असल्याचे शरदला समजले.

जुलै महिन्यात दिनकर आणि शरद एकमेकांना भेटले. तेव्हा एसआरए योजनेतुन घर मिळवून देतो असे सांगत शरदने दिनकर यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर शरदने दिनकर यांच्या पत्नीच्या नावाने एसआरएचे बनावट अलोटमेन्ट पत्र देखील दिले.

दरम्यान, शरदने आपली फसवणूक केल्याचे समजताच दिनकर यांनी शीव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून एपीआय प्रदीप सालेकर आरोपीचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. शरदने शहरातील अनेकांना सरकारी योजनेतील घर मिळवून देतो असे सांगत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.