मंथन – स्वप्नांची ‘रद्दी’ करणारी पेपरफुटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भारत सातपुते

यंदाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट’ पेपरफुटीच्या गर्तेत सापडली आहे. केंद्र सरकारने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली असून आता 21 जून रोजी पुन्हा ही परीक्षा होईल. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षणक्षेत्राची विश्वासार्हता पणाला लागलेल्या या पेपरफुटी प्रकरणामुळे मुलांच्या मनावर गंभीर आघात झाले आहेत.

एका वर्षांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शेतामध्ये  मेहनतीने सकस पिकांसाठी पेरणी करा. पाच-दहा वर्षांत फळे हवी असतील तर झाडांची चांगली जोपासना करा व केवळ पाच-पन्नास नव्हे, तर पुढची उज्ज्वल भविष्याची शेकडो वर्षे माणुसकीची उभारणी करायची असेल तर माणसांनी माणसांच्या गावात आजच व आताच ज्ञानाची जोपासना करा असे एका विचारवंतांनी म्हटले आहे. लाखो स्वप्नांचा चक्काचूर करणारे, एवढेच नव्हे तर स्वप्नातदेखील असे घडणार असेल असे कोणाला वाटत असेल का? स्वप्नंदेखील ओक्साबोक्सी रडावीत, माणसांना माणसांच्या शब्दांचा वीट यावा, एवढा हाहाकार या ‘नीट’ प्रकरणाने  माजवला आहे.

गेल्या काही वर्षांत आपल्याला तालुकास्तरावर व त्याहीपेक्षा जिल्हास्तरावर ट्युशनची गर्दी होऊ लागली आहे. एकट्या लातूर शहरात किमान चाळीस हजार तरी मुले ही टय़ुशनच्या गर्दीत आहेत.  या महाराष्ट्रातील, देशभरातील हजारो मुलांचा लोंढा जो टय़ुशनमध्ये वाढला आहे त्या मुलांचे प्रवेश मात्र दोन-दोन वर्षे हे त्यांच्या गावाकडे असतात. पूर्वी गांधीजींनी नारा दिला की, खेड्याकडे चला. आता मात्र या शिक्षणाच्या प्रवाहाने नवीनच नारा निर्माण केला आहे, तो म्हणजे टय़ुशनसाठी शहरात चला. दोन-दोन वर्षे ही मुले जर आपले गाव, शाळा, कॉलेज सोडून शहरातल्या टय़ुशनच्या ठिकाणी राहत असतील तर प्रश्न असा निर्माण होतो की, या हजारो-लाखो मुलांनी जिथे प्रवेश घेतला आहे तिथल्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी कोणाला शिकवायचे? का वर्षोनुवर्षे हे फुकटचा पगार उचलत आहेत. यांच्या खोट्या हजेऱ्या  का टाकल्या जातात? टय़ुशनमध्ये जे शिकवले जाते ते त्यांचे प्रवेश असलेल्या ठिकाणी तिथले शिक्षक-प्राध्यापक हे शिकवू शकत नाहीत का? तसे तर शहरातीलदेखील काही शाळांमधील प्रवेश असलेली मुलेही राजस्थानातील एका कोट्यामध्ये शिकतात. काय म्हणावे याला!

ज्ञानाच्या संपत्तीपेक्षा धनाची संपत्ती जोर धरू लागली. त्यामधून ही ‘नीट’ची  प्रकरणे चव्हाट्यावर आली. सध्या ज्या लोकांच्या चर्चा सुरू आहेत ते तर वरवरचे आहेत. यात धनदांडगे डॉक्टर असलेले पालकदेखील सहभागी झाले आहेत. आता अशा बोगस पद्धतीने जर उद्या विद्यार्थी डॉक्टर व्हायला लागले तर चांगला पेशंटदेखील 100 टक्के दगावणार आहे व तेव्हा हेदेखील दाम देऊनच अशी प्रकरणे मिटवण्यात पटाईत होणार. ही जसजशी पाळेमुळे खोदत जाऊ तसतसे यांचा विस्तार हा अफाट व भयाण आहे हे लक्षात येईल.

टय़ुशन म्हणजे लातूर पॅटर्न नाही! 

साधारण पन्नास वर्षांपूर्वी संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वात तत्कालीन प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. अनिरुद्ध जाधव, प्रा. कावळे आदी कर्मचारी हे मोटरसायकलवर फिरून या महाविद्यालयात प्रवेश घ्यावेत म्हणून वणवण विद्यार्थी मिळवण्यासाठी भटकायचे. त्यातून हळूहळू या महाविद्यालयाचा प्रवेश वाढला व विज्ञान क्षेत्रात गुणवत्ता निर्माण केली. आशीच गुणवत्ता शहरातल्या दयानंद, बसवेश्वरसह जिल्हाभरातील अनेक शाळा-महाविद्यालयांत दिसू लागली व टय़ुशन न लावता या महाविद्यालयातून विद्यार्थी डॉक्टर होऊ लागले मग यामधून ‘लातूर पॅटर्न’ हा शब्द रूढ झाला. पुढे पुढे या नामांकित महाविद्यालयात शंभर टक्के, 99 टक्क्यांच्या खाली प्रवेश मिळत नव्हता तेव्हा मात्र हा शैक्षणिक पॅटर्न नाही असे आम्हीच लिहू लागलो. कारण इथे फक्त सोन्याला प्रवेश देतात. आमचे असे म्हणणे आहे की, 50-60 टक्केवाल्यांनाही प्रवेश द्यावा व त्याचे पाच टक्के तरी वाढवून दाखवावे. परंतु ‘लातूर पॅटर्न’ हा रुढ झालेला शब्द मात्र आम्ही विसरायला तयार नाहीत. पण विना टय़ुशन हा पॅटर्न टिकवला होता. नंतर शहरात लातूर पॅटर्नच्या नावाखाली टय़ुशनचा पसारा सुरू झाला व हा पॅटर्न मात्र नको तिथे वळण घेत आताच्या या वळणावर पोहोचला आहे. तेव्हा हा टय़ुशनचा वर्ग म्हणजे लातूरचा शैक्षणिक पॅटर्न नाही.

मी जिल्हा परिषदेला शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. दहावी, बारावी, डी.एड.च्या परीक्षेला हे पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, बैठेपथक, भरारी पथक, कस्टोडीयन अशा वेगवेगळ्या भूमिकेतून दहा-वीस वर्षे काम केले आहे. साधारण शंभरपेक्षा जास्त हे मी रस्टिकेट केले आहेत. जिथे जिथे मी या बोर्ड परीक्षांचा केंद्रसंचालक होतो तेथील निकाल हा किमान 70-80 टक्क्यांनी घसरला आहे. जिथे पूर्वी शंभर टक्के, नव्वद टक्के निकाल असायचा तेथील निकाल माझ्या काळात हा 25 ते 30 टक्केच्या वर जाऊ शकला नाही.

मानसिकता हरली

देशभरातून लाखो विद्यार्थी आपल्या आयुष्य नीट व्हावे म्हणून ही ‘नीट’ परीक्षा देत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या परीक्षांसाठी मुले झटत होती. एका महिन्याला राहणे व जेवणे यासाठी किमान पाच हजार रुपये खर्च, शिकवणी वर्गाची एक लाखभर फी, लाखो रुपयाचे साहित्य लागते या मुलांना. आपला पोरगा चांगला दिसावा म्हणून भारी भारी ड्रेस घेऊन द्यायचा. या ‘नीट’ प्रकरणात चार आण्यांचे चुकलेही असेल, पण बाराण्यांचा काय दोष आहे?  सर्वच एका जात्यात भरडले गेले. परीक्षा पुढे ढकलल्या, परीक्षा पुन्हा होणार, पण दिवसरात्र डोळे फोडून ज्याने अभ्यास केला त्यांच्या डोळ्यापुढे अंधकार पसरला आहे. या ‘नीट’च्या परीक्षा झाल्या झाल्या अनेक विद्यार्थ्यांनी आता हे ओझे काय करावे म्हणून या अभ्यासाचे साहित्य बेभानपणे रद्दीवाल्यांना विकून टाकले. त्यांच्या स्वप्नांची रद्दी कशी झाली हे ‘नीट’ प्रकरणातून उघड झाल.

‘नीट’ परीक्षांची गरज आहे का? 

झाले काय की, या ‘नीट’ परीक्षेला एवढे महत्त्व आले की, वर्गातील नियमित अभ्यास, परीक्षा या सर्व गौण ठरायला लागल्या. या वर्गातल्या अभ्यासाकडे कुणी लक्ष देईना. आपण 50 टक्के मार्क सहज घेऊ शकतो त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले व नीट परीक्षेला महत्त्व आले. म्हणजे एखाद्या लग्नात नवरदेवाला नवरीपेक्षा करवली महत्त्वाची वाटणे व तिच्यासाठीच आपली शक्ती वाया घालवावी तसे या नीट परीक्षेचे झाले.  या नीट परीक्षेच्या मेरिटवरून प्रवेश ठरू लागले. माझे प्रामाणिक म्हणणे आहे की, नीटचा जो अभ्यासक्रम आहे तोच बहुतांशी व स्पष्टपणे आहे तो अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा व त्यातल्या गुणवत्तेवरून पुढे प्रवेश मिळावेत. सर्वच क्षेत्रांतील प्रवेशासाठी हा मार्ग अवलंबण्यात काय अडचण आहे?

(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

[email protected]