
पंखा हा घरात थंड हवेची झुळूक निर्माण करतो. त्यामुळे खोली आपल्याला आनंददायी वाटते. परंतु पंखा फिरत असताना पंख्याच्या पात्यांवर धूळ, घाण जमा होत जाते. त्यामुळे पंखा दिसायला मळकट होतो आणि खोलीचे सौंदर्यही कमी होते. पंख्याच्या पात्यावरील धुळीमुळे आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या घरातील पंख्याची सफाई करणे गरजेचे असते. मात्र पंख्याच्या पात्यावर जमा झालेली धूळ ही चिकटून बसल्याने पंखा साफ करताना बराच त्रास होतो. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्हीही पंखा पटकन चकचकीत करू शकाल.
पंखा प्रथम स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका. हलक्या हातांनी पुसून, पंख्यावरील शक्य तितकी घाण काढून टाका, जास्त घासण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहजपणे मिळणारा बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची पेस्ट हा पंखा चमकवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. हे तयार करण्यासाठी, 1 वाटी व्हिनेगरमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट फॅनवर नीट लावा आणि 7 मिनिटे तशीच ठेवून द्या. त्यानंतर ओल्या कापडाने पंखा पुसून टाका. पेस्ट कुठेही राहू नये याची काळजी घ्या, अन्यथा पंख्याचा रंग खराब होऊ शकतो. पंखा स्वच्छ करण्यासोबतच त्याची चमकही कायम ठेवायची असेल, तर घाण साफ केल्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावा. यासाठी सुती कापड हलके तेलात भिजवून संपूर्ण पंख्यावर घासावे. जास्त तेल वापरू नका.
वरील पद्धत वापरून तुम्ही तुमचा पंखा धूळ आणि चिकट होण्यापासून वाचवू शकता. महिन्यातून किमान दोनदा फॅन ब्लेड स्वच्छ करणे आणि दर सहा महिन्यांनी संपूर्ण फॅनची सफाई करणे गरजेचे असते.



























































