10, 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. गायकवाड यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. सध्याची परिस्थिती ही परीक्षा घेण्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. विद्यार्थींचे आरोग्य हे महाविकास आघाडी सरकारसाठी प्राधान्याची गोष्ट असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेता बारावीच्या परीक्षा या मे महिन्याच्या शेवटी घेण्यात येतील तर 10 वीच्या परीक्षा या जून महिन्यात घेण्यात येतील असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दोन्ही परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे त्या म्हणाल्या

परीक्षाबाबत विद्यार्थी आणि पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी, विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर तसेच मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे CBSE ICSE, Cambridge आणि IB बोर्डालाही परीक्षांच्या तारखांबाबत पुनर्विचार करून त्या पुढे ढकलण्याची विनंती केली जाणार आहे.