बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेची भीती,  ‘पीसीबी’ विषयांच्या हातच्या 30 गुणांवर पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे वर्षभर कॉलेजची पायरी न चढलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षेची भीती वाटत आहे. प्रॅक्टिकलची परीक्षा झाली तर प्रयोग कसे करणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. कॉलेज बंद असल्याने ऑनलाइन अभ्यास करणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना प्रयोगांचे ‘प्रॅक्टिकल’च करता आलेले नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील उपकरणे कशी वापरावी, सोल्यूशनचा वापर कसा आणि किती करायचा, अंतिम निरीक्षण कसे नोंदवायचे याविषयी अद्याप तरी काहीच सराव झालेला नाही.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या पेपरपॅटर्नविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. अभ्यासक्रम कमी केला असला तरी प्रश्नपत्रिका कशी असेल, प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा होणार आहेत का? श्रेणी विषयांचे मूल्यमापन कसे करणार या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सदस्य आणि फिजिक्सचे प्राध्यापक हेमंत शिंदे यांनी सांगितले, ‘प्रॅक्टिकल स्किल विकसित करण्यासाठी सराव आवश्यक आहे. जानेवारीच्या मध्यावर बारावीचे वर्ग सुरू झाले तरी सर्व विषयांतील प्रॅक्टिकल्सचा सराव दोन ते तीन महिन्यात करणे कठीण आहे.’

आयडॉलचे प्रवेश पुढील आठवडय़ात?

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राचे प्रवेश पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहेत. या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या एक दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावी फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या सत्रात प्रवेश घेता येईल. युजीसीने मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेला जुलै आणि जानेवारी या दोन सत्राच्या प्रवेशाला मान्यता दिली आहे.

यंदा कोरोनामुळे अनेक अभ्यासक्रमांचे निकाल विलंबाने लागले आहेत. तसेच फेरपरीक्षेचा निकालही विलंबाने लागल्याने विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. जानेवारी सत्राचे प्रवेश करण्याची तयारी आयडॉलने जवळपास पूर्ण केली आहे. या प्रवेशाला येत्या दोन तीन दिवसांमध्ये सुरूवात होणार असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.