
गुजरातच्या बडोदामध्ये केलनपूर परिसरात एका बांधकाम्याच्या ठिकाणी खोदकाम सुरू असताना तब्बल 11 फूट विशालकाय मगर आढळली. त्यामुळे तेथील कामगारांमध्ये घबराट पसरली. मात्र, वन्यजीव मदत पथकाने मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढले असून तिने काहीही नुकसान केले नसल्याची माहिती मिळाली आहे. एवढ्या मोठ्या आकाराची मगर पहिल्यांदाच पाहिल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ही मगर 10 ते 11 फूट लांबीची असून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोल ठिकाणी ही मगर आढळून आली, असे वन्यजीव मदत पथकाचे अध्यक्ष अरविंद पवार यांनी सांगितले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक विशालकाय मगर आढळल्याची माहिती बिल्डरकडून मिळाल्यानंतर आमचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
पथकाने या मगरीला त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढले असून तिला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मगरीला बाहेर काढल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत ती तंदुरुस्त आढळल्यानंतर वन विभागाकडून तिला नैसर्गिक अधिकावासात सोडण्यात आले आहे. या मगरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही विशालकाय मगर या भागात कशी आली. याची चर्चा होत आहे. नैसर्गिक अधिवास नसलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या आकाराची मगर आढळल्याची ही दुर्मिळ घटना आहे.



























































