
‘मला माफ कर’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून पत्नीच्या विरहात पतीने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना पाचपावलीतील लालगंज खैरीपुरा येथे सायंकाळी उघडकीस आली. देवेंद्र बापू निमजे (वय 35) असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा खासगी व्यवसाय आहे. खैरीपुरा येथील घरीच त्यांचे गोदाम आहे. गोदामाच्या बाजूलाच त्यांची बहीण मनीषा नगरधनकर राहतात.
दोन वर्षांपूर्वी देवेंद्र यांनी शहनाज या तरुणीसोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. शहनाज माहेरी गेल्या. सायंकाळी देवेंद्र हे मनीषा यांच्या घरी गेले. काही वेळाने ते गोदामात गेले. गोदामातील लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळाने देवेंद्र यांचा भाचा गोदामात गेला. ते गळफास लावलेले दिसले. त्यांनी मनीषा यांना आवाज दिला. त्यांनी हंबरडा फोडला. शेजाऱयांनी पाचपावली पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला, पंचनामा केला. पोलिसांनी देवेंद्र यांनी आत्महत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘शहनाज मला माफ कर’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी ती जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



























































