तेलंगणामधील हैदराबाद येथील एका वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली होती. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते. यावेळी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी हा वाहतूक पोलीस तब्बल 2 किलोमीटर धावला. त्याच्या या कामगिरीमुळे या वाहतूक पोलिसाचे सामान्यांकडून कौतुक होत आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यानची आहे. वाहतूक पोलीस ‘जी बाबाजी’ आपल्या ड्युटीवर होते. तेव्हा त्यांनी पाहिले की, एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली आहे. रुग्णवाहिकाचा चालक गाडी काढण्याचा पर्यंत करत होता, मात्र वाहतूक कोंडीमुळे त्याला ते जमत नव्हते. त्यावेळी बाबाजी या रुग्णवाहिकेकडे आले आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढत रुग्णवाहिकेला रस्ता दिला. याबाबत बोलताना बाबाजी यांनी सांगितलं, ‘रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी केले.’
लोकांनी टाळ्या वाजून केलं कौतुक
बाबाजी म्हणाले, जवळपास 7 वाजले होते. माजी नजर वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेकडे गेली. मी लगेचच रुग्णवाहिकेकडे गेलो आणि मार्ग मोकळा करण्यासाठी लोकांना विनंती केली. या वाहतूक पोलिसांची प्रामाणिकता पाहून त्यावेळी तेथे उपस्थित वाहन चालकांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘बऱ्याच वाहन चालकांनी माझ्या पाठीवर थाप मारत मी चांगले काम करत असल्याचे म्हणाले. त्यावेळी मला खूप आनंदी आणि समाधानी वाटलं.’
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
रुग्णवाहिकेत बसलेल्या एका व्यक्तीने या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



























































