आयआयटीत हायड्रोजन बलूनचा स्फोट, दोन विद्यार्थ्यांसह तीन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
iit-mumbai

सामना प्रतिनिधी । मुंबई

पवई येथील आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत आज दुपारी हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन विद्यार्थ्यांसह तीन जण किरकोळ भाजले. त्यांना आयआयटीच्या रुग्णालयात प्रथमोपचार दिल्यानंतर ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

आयआयटीमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये आज दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. एका संशोधन प्रकल्पावर काम करणारे प्रशांत सिंग आणि रजत कुमार हे दोन इंटर्न विद्यार्थी आणि एरोस्पेस इंजिनियरींगचा माजी विद्यार्थी तुषार जाधव हे तिघे त्या प्रयोगशाळेमध्ये एका बलूनमध्ये हायड्रोजन भरत असताना स्फोट होऊन बलून फुटला. त्यात प्रशांत आणि तुषार हे 16 टक्के तर रजत हा 4 टक्के भाजला. त्यांना तातडीने आयआयटीमधील रुग्णालयात नेण्यात आले. अंगावर भाजल्याच्या जखमा असल्याने नंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये हलवण्यात आले. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आयआयटीच्या प्रशासनाकडून देण्यात आली.